गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

कृतज्ञता

एका प्रसिद्ध लेखकाचं पुस्तक वाचताना एक सुंदर वाक्य वाचलं.... 'कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण, हा आयुष्यातला मोठा क्षण असतो... ' त्या क्षणापासून कुणालाही वंचित करू नये...'  वाक्य वाचलं, आणि अगदी पटलं मनापासून... खरोखर कृतज्ञता व्यक्त करतो का आपण प्रत्येकवेळी छोट्या छोट्या गोष्टींबद्दल किंवा आपल्याजवळच्या व्यक्तींबद्दल... नाही करत आपण असं ... आपण गृहीत धरतो कितीतरी गोष्टी ... आज वाक्य वाचल्यावर आठवलं माझ्या आजीचं वाक्य... ती नेहमी म्हणायची , देवाने तुम्हाला धडधाकट बनवलं आहे .. हातपाय नाक डोळे सगळं नीट आहे याबद्दल त्याचे आभार मानावेत... आज आठवू लागले की आयुष्यातल्या कितीतरी व्यक्तींचे आणि गोष्टींचे आभार मानायला हवे आहेत मी .... माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्ती , आई -बाबा , माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील माझे मित्रमैत्रिणी, शिक्षक, नातेवाईक, भावंडं, अनेक अनामिक व्यक्ती ज्यांनी वेळप्रसंगी मला घडवलं होतं , सावरलं  होतं , सांभाळून घेत माझ्या चुकांना सुधारायला मदत केली होती... लहानपणापासून मला वेळोवेळी या सगळ्यांनी अनेक प्रसंगात साथ दिली होती त्यांचे आभार इ खरंच मानलेत का? नसतील मानले तर अजूनही वेळ नाही गेलेली... आपणा सगळ्यांच्या आयुष्यात हि वेळ उशिरा येऊ नये... त्या त्या वेळी आपण आभार कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे आणि आता मी ती करत राहणार कायम... 

शब्द

शब्द एक तुझा... शब्द एक माझा...
शब्द घडवितसे संवाद साधा...

शब्द कधी मोठा... शब्द कधी छोटा...
शब्द जागवितसे भाव खरा खोटा...

शब्द कधी त्रास... शब्द कधी आस...
शब्द कधी असतो वास्तवातला आभास....

शब्दास असे अर्थ... शब्द कधी व्यर्थ ...
शब्दच घडवीतसे अर्थाचा अनर्थ...

शब्द कधी भार... शब्द तळपती तलवार ...
शब्द असती कधी प्रेमाची संततधार ...

शब्द कधी शाप ..शब्द अखंड वरदान...
शब्द झेलता झेलता घडतसे मान अपमान...

शब्द संवादाचे साधन.. शब्द भावनांचे चित्रण...
शब्द मौनाचे उत्तर ... शब्द नात्यातील अत्तर... 

आताशा

आताशा होतो आठवणींचा मारा... 
कधी मंद सरींचा; कधी झोबंणारा ... 
कधी माजतो हलकल्लोळ सारा... 
मनी जागतो क्षणांचा पसारा.... 

आताशा येतसे जाग प्रत्येक रात्री.... 
जाग येताच होई तडफड गात्री... 
बैचैन बेभान माझ्या मना ... 
कधी सावरशील? जरा थांब ना.. 

आताशा सावरायचे तुझे तूच तुला... 
कोणी नसे सोबती, चलो एकला ... 
नको डगमगू अडखळु चालताना... 
नको मागे वळू पुढे बघताना ..... 


अर्थ

तुझ्या माझ्या नात्याला लाभला अर्थ नवा .......
तुझ्या माझ्या नात्याला 'प्रेम' हाच दुवा .....
तुझ्या  माझ्या संवादाचा जपलेला ठेवा....
तुझ्या माझ्या नात्यात राहो सदा गोडवा .....

तुझ्यासवे मी एकरूप व्हावे...
तुझ्यासवे मी स्वप्नगीत गावे ....
तुझ्या माझ्यात असावा अतूट बंध...
तुझ्या माझ्या आठवणींचा दरवळता  सुगंध....

प्रेमधारा बरसती तुझ्या माझ्या मनात..
तुझा माझा अबोल संवाद प्रत्येक क्षणात...
तुझ्या विरहात तुझीच आठवण ....
तुझ्या सोबतीची मनात साठवण...

तुझ्या माझ्या स्वप्नांचा झुलतो झुला....
क्षणोक्षणी स्मरे माझे मन तुला...
जसा गुंजन करी भ्रमर पाहुनी फुला ....
तसा भासतोस तू जवळी मला...

तुझ्या डोळ्यात पाहता मी जाते वेडावुनी...
तुझ्या स्पर्शात नाहता  मी जाते बावरूनी ...
तुझ्या हातात हात देता मी शाहरुनी जाते...
तुझ्यासवे जगताना माझी मी न राहते ....