मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०१५

       कधी कधी एखादी  छोटीशी गोष्टसुद्धा मनाला आनंद देऊन जाते, समाधान देऊन जाते.....तिला जाणवलं की आजही इतक्या वर्षांनी त्याला आपल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आहेत......!!!! आज आठ-दहा वर्षांनी भेटलो आहोत आणि आता पुर्वीसारखं बोलणं होत नसलं तरी आजही आपल्या आवडीनिवडी तो विसरला नाही, ही भावनाच तिला काही देऊन गेली....तिला आठवले कॉलेजचे दिवस...
     शहरातलं मोठ्ठं कॉलेज...त्या कॉलेजमध्ये त्याची आणि तिची पहिली ओळख झाली ती नंतर मैत्रीत रूपांतरीत झाली...एकाच विषयाचा अभ्यास करताना, मैत्रीचं नातंही खूप छान प्रकारे जुळत गेलं...जपलं जाऊ लागलं.... तो तसा फार बोलका नव्हता,मूळातच थोडा moody  होता... बोलावंसं वाटलं तर इतकं बोलेल की आवरता आवरता नाकीनऊ....!!!! पण काही वेळा इतका अबोल होऊन जाईल... पण तरीही त्यांची मैत्री फुलत गेली...अबोल असूनसुद्धा भावनिक संवाद चालत होता हे मात्र दोघांना जाणवलं....शुद्ध निखळ मैत्री...आणि इतक्या चांगल्या भावनांनी, विश्वासाने फुललेली, दोघांनी मनापासून जपलेली मैत्री ....!!! त्याला तिची छोटी छोटी गोष्ट लक्षात असे...तिच्या मनात चालणारी चलबिचल... अवघडलेपणा न सांगताच त्याला जाणवत असे.... आनंद, दुःख, राग,चीड, संताप, अस्वस्थता.....अशा भावनांना अचूकपणे जाणणारा तो तिचा मित्र ख-या अर्थाने     'मित्र' होता... तिला देखील त्याच्या असण्याचा अर्थ जाणवत होता, कळत होता.. मुलगा आणि मुलगी यांच्यात निखळ मैत्री होऊ शकत नाही हा गैरसमज आहे हे त्या दोघांच्या मैत्रीकडे पाहून तिला ते पटायचं.
      आता आठ-दहा वर्षांनी भेटले ते दोघे.. एका मैत्रिणीच्या लग्नात....लग्नात जेवताना कोणीतरी तिला कोथिंबीर वडी वाढण्यावरून विचारलं,पण ती काही म्हणायच्या आतच त्याने परस्पर सांगितले, ’’ तिला नाही आवडतं कोथिंबीरीची वडी’’ आणि ती इतक्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली..... त्याला इतक्या वर्षांनी भेटलो तरी त्याच्या लक्षात आहे हे पाहून तिला जाणवलं की आजही किंवा कितीही काळ गेला तरी आपल्या मैत्रीची वीण इतकी घट्ट आहे की अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्या दोघांना आठवत राहतील.....आणि आपण आपल्याला ओळखत नाही इतकं चांगलं तो आपल्याला ओळखतोय आतून...अगदी खोलवर असलेल्या मैत्रीच्या नात्यातून....!!!!!!!