रविवार, १३ मार्च, २०११

चिंब पाऊस

चिंब चिंब पावसाने, झाले तन मन ओले
थेंबाथेंबातुनी कोणी मनातले भाव बोले    
झाला पालट पालट, काय बदल क्षणात
चैतन्याचा वारा वाहे, साऱ्या जनमानसात

सारी चराचर सृष्टी, नवा तजेला लेवून
धरतीही तृप्त झाली,ओल्या ओल्या स्पर्शातून
हिरव्या रंगाची उधळण, होई पानापानातून
नव्या सृजनाची जाण, उगवत्या कोंबातून

नवनिर्मितीची असे एक अनामिक ओढ
बहरत्या ऋतूला या नसे कशाचीच तोड
बंध जुळती मनाचे अशा ओल्याचिंब वेळी
ही ओलीचिंब नाती कधी स्मरती अवेळी

पानाफुलांसवे गाती, पक्षी स्वछंदाचे गीत
नव्या पालवीसवे दाटे, एक अबोल ही प्रीत
कधी अचानक भेटे, स्वप्नातला मीत
वाटे अशा पावसात तो, असावा समीप

काळे मेघ दाटू येता, पक्षी पाही आकाशात
पिल्लांनाही जाणवे वर्षाचाहूल घरट्यात
भान विसरुनी जाती, सर पावसाची येता
पिल्ले पाखरे विहरती, ओलेचिंब होता होता

हिरव्या रानात फुलता, फुले सर्व रानोमाळ
निसर्गाचे रूप बदलण्या आला पावसाळी काळ
खळाळत्या पाण्यानेही धरला ठेका आणि ताल
रंगारंगाच्या बुट्यांची ल्याली सृष्टी हिरवी शाल




प्रत्येकाने असतं नात एक जपलेलं...

प्रत्येकाने असतं नातं एक जपलेलं...
ओल्याचिंब आठवणींनी खोल मनात दडलेलं...
कातरक्षणी डोळ्यात पाणी आणणारं..
रात्रीच्या समयी स्वप्नांच्या कुशीत शिरणारं..

प्रत्येकाने असतं नातं एक जपलेलं...
नकळत का होईना स्वतःशी जोडलेलं..
बेभान होताना भानावर आणणारं..
साद घालताच, हातात हात घेणारं...

प्रत्येकाने असतं नातं एक जपलेलं...
विस्मृतीत जाऊ म्हणता जाऊ न शकलेलं..
भावस्पर्शातून हळुवार अलगद स्मरणारं..
स्मरता स्मरता मनात चांदण फुलवणारं..

प्रत्येकाने असतं नातं एक जपलेलं...
नात्याच्या गुंत्यात कधी न गुंतलेलं...
जगण्याच्या वाटेवर दिलासा देणार..
कुणासाठी तरी काळजी करू लागणार..

प्रत्येकाने असतं नात एक जपलेलं...
मैत्री आणि प्रेमाच्या भावनेनं खुललेलं..
जाणत असून सुद्धा अजाणत बनलेलं...
बोलता बोलता अचानक अंतर्मुख होणारं...

प्रत्येकाने असतं नातं एक जपलेलं...
आयुष्याच्या धावपळीत कधी न हरवलेलं..
क्षणाच्या भेटीत युगांचा आनंद देणारं..
हुरहुरत्या क्षणी काळीज चिरत जाणारं..

एक संध्याकाळ

एक संध्याकाळ.....सैरभैर करणारी...
माणसात असून सुद्धा अगदी एकटं पाडणारी...
आठवणींच्या  क्षणांनी बैचैन करणारी..
सलणाऱ्या वेदनेला,तरी सुद्धा जपणारी...

एक संध्याकाळ...मंतरलेली..
आशेच्या किरणांनी प्रकाशलेली...
विश्वासाच्या आधारे तरारलेली..
मायेच्या छायेत बहरलेली...

एक संध्याकाळ... वेड्यागत वागणारी..
उगाचच हसवत डोळ्यात पाणी आणणारी...
स्वप्नांच्या जगात हळूच डोकावणारी...
पण  वास्तवाला मात्र  न विसरणारी...

एक संध्याकाळ... स्वप्नाळलेली....
प्रयत्नांच्या ज्योतीने उजळलेली....
अतूट नात्याने जुळलेली....
स्नेहबंधनाने मोहरलेली....

एक संध्याकाळ... घुसमटलेली.....
वेदनेच्या हुंदक्यांनी दबलेली....
भीतीच्या वातावरणात दडपलेली.....
प्रेमाची भाषाच हरवलेली.....

एक संध्याकाळ.. स्मरलेली.....
कायम मनात जपलेली....
मौनातूनही  खुललेली.....
क्षण अन् क्षण जगलेली....