सोमवार, १ डिसेंबर, २०१४

          माणसाचं  मन म्हणजे खरचं अनाकलनीय अदभूत आणि गूढ आहे, आपल्या मनाला आपण एका क्षणी निराशेच्या गर्तेत  लोटतो किंवा आनंदाने बेहोष होताना अनुभवतो. हे खरचं इतक्या उपरोधाचं असून देखील ते तितकचं खरं आहे..... तो क्षण, आपण किती उत्कटतेने जगलो हे कदाचित त्यावेळी जाणवत नाही,पण नंतर कधी आठवला तर मात्र जाणवतं तो क्षण आपण खरचं उत्कटतेने जगला आहे...अशा वेळी तो क्षण मनाला कोणती बोच लागू देत नाही, की मनात सलत रहात नाही......
          खरचं, विचार केला तर जाणवतं की अशा अनेक क्षणांचा उत्कटतेने घेतलेला अनुभव म्हणजेच ‘जगणं’ का??? की यावेगळं देखील काही आहे, जे आपण अनुभवलेलं नाही आणि कदाचित तेच खरं ‘जगणं’ आहे???? किती प्रश्नांचं जाळं विणायचं आपणच  आपल्याभोवती हे मात्र ज्याचं त्याचं, त्यानेच ठरवायचं...कारण त्या जाळ्यात अडकून राहून जगण्याचा आनंद घेता येणार नाही किंवा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नाही सापडला तर मग छोट्या गोष्टीचा होणारा आनंदही आपण गमावून बसू ही भीती मनात निर्माण होते; आणि म्हणूनच प्रत्येक क्षणी आपणचं आपल्याला सावरतो, आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करतो....
                कधी कधी गुंतून गूंता वाढतो, कधी कधी त्याच गुंत्यातून निश्चयाने आपण बाहेरही पडतो... आहे की नाही मजा??? मनाच्या  दोन त-हा.....!!! पराकोटीच्या भावना मनात येतात, सतत रहातात आणि आपल्याला हरप्रकारे गुंतून टाकतात... तर कधी काही काळ एखादी ओली जखम घेऊन आपण वावरतो आणि कालपरत्वे पुन्हा सावरतो... नवा मार्ग, नवी स्वप्नं, नवा आशावाद मनात जागवतो...त्यावेळी आपणच आपल्याला नवे भासतो... आपली एक नवी ओळख, आपला एक नवा पैलू आपल्याच समोर येतो....!!! वाटतं, अरे ही व्यक्ती मीच का?? हा माझाच चेहरा का??? इतक्या वर्षात मी कसा ओळखलं नाही माझं मला......???????
                     हीच मजा ...स्वतःला ओळखण्याची मजा.... आपल्याला ख-या अर्थाने जाणून घ्यायची आपलीच धडपड... हीच धडपड जगण्याची चिवट इच्छा मनात निर्माण करते....!!! पुन्हा नवीन स्वप्नांना सजवत, त्यांच्यात आपल्या आवडीनुसार रंग भरत... कधी अपेक्षापुर्तीचे, तर कधी अपेक्षाभंगाचे.....!!! कदाचित पुन्हा तीच चूक करूनही, हार न मानता जगणं किती आणि कायं कायं देतं....???? आपल्या मनाचा आतला आवाज कायम आपल्याला सावरत असतो, नवा जोश आणि नवी स्वप्नं निर्माण करायला लावत स्वतःलाच आपल्याही नकळत आपण बदलत जातो....