रविवार, २७ मार्च, २०११

मी पुन्हा एकदा बहरणार....

मी पुन्हा एकदा बहरणार..
अनामिक प्रेमाने फुलणार...
पुन्हा नव्या स्वप्नांना सजवताना
कुणाला तरी स्मरणार...

मी पुन्हा एकदा बहरणार..
अनामिक प्रेमाने फुलणार..
पुन्हा नव्या फुलणाऱ्या आशेला
उत्तुंग भरारीचे वेड देणार...

मी पुन्हा एकदा बहरणार
अनामिक प्रेमाने फुलणार..
पुन्हा नव्याने आयुष्याचे इंद्रधनू
रंगारंगाने खुलवणार..

मी पुन्हा एकदा बहरणार..
अनामिक प्रेमाने फुलणार..
पुन्हा नव्या भावस्पर्शातून
जुन्या आठवणींना जपणार..

मी पुन्हा एकदा बहरणार..
अनामिक प्रेमाने फुलणार..
पुन्हा नव्या आर्त सादेला
मनापासून दाद देणार..

मी पुन्हा एकदा बहरणार...
अनामिक प्रेमाने फुलणार..
पुन्हा नव्या पालवीसंगे
चिंब चिंब भिजणार..


खरंच असतं का कोणी आपलं...??

खरंच असतं का कोणी आपलं...??
आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापणारं ..
भावना जागताच,नजरेत उमटणारं ..
नुसत्या आठवणीनी मनात घुटमळणारं ..

खरंच असतं का कोणी आपलं...??
नाजूक धाग्यांनी  मन जोडणारं ..
नुसत्या प्रेमाने साथ देणारं ..
छोट्या छोट्या गोष्टी मनात जपणारं ...

खरंच असत का कोणी आपलं...??
 अवघड क्षणी हातात हात घेणारं ...
आर्त साद घालताच धावत येणारं ..
आश्वासक स्पर्शातून धीर देणारं ..

खरंच असतं का कोणी आपलं...??
आपल्या आनंदाचा सूर शोधणारं ..
आपल्यासाठी फक्त आपल्यासाठी जगणारं ...
आपल्या आयुष्यासाठी प्रार्थना करणारं ..

खरंच असतं का कोणी आपलं...??
आपल्यापासून दूर पण आपल्या अगदी जवळ असणारं ...
न सांगताच मनातलं हितगुज जाणणारं ...
डोळ्यांच्या भाषेतून मनातलं बोलणारं ......

शनिवार, २६ मार्च, २०११

गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा.....

ती संध्याकाळी गाणं ऐकत होती ...
'स्वप्नातल्या कळ्यानों , उमलू नकाच केव्हा ...  गोडी अपूर्णतेची लावील वेडं जीवा....'  
       आणि तिला टचकन भरून आलं...!! अपूर्ण स्वप्नं अशीच जीवाला वेड लावून गेल्याचं तिच्या मनाला जाणवलं.......तिला आठवला तो... शेवटचं भेटलेला...किती सहज सांगितलं त्याने तिला, "आता आपण इथेच थांबायचं या वळणावर ........!!!! " तिला  सांगताना देखील, तो किती शांत होता  ते बघताना खूप नवल वाटलं...धक्का तर बसलाच...!!! पण तो शांत आहे हे कळल्यावर तिने  चिडचिड करून काहीच उपयोग नव्हता... कारण त्याने त्याचा निर्णय सांगण्यासाठी बोलावलं होतं तिला .....!! तिचा निर्णय,तिचं मत काय असेल हे विचारायचं नव्हतं त्याला.... कारण  त्याला माहित होतं की तिचा विचार किती पक्का आहे ते आपल्याबाबतीत .....!!!!
                           समजुतदारपणे होतं तिचं वागणं अगदी पहिल्यापासून ... !!!  त्यामुळे त्याक्षणी देखील ती शांत राहिली ... त्याचे शब्द ऐकताना मनात आलेला मोठ्ठा आवंढा गिळला तिने मोठ्या मुश्किलीने.....!! त्याला धीर देत सावरत राहिली खरी ती, पण तिलाच आतून जाणवलं की हा पोकळ दिलासा आहे. शब्द काहीवेळा हरवून जातात कसे अचानक...... !!!!!!!!!!!!      
             त्याला समजावत आहोत आपण की आपल्या मनाला खोटा दिलासा देत आहोत आपण.....????? त्याचा हा निर्णय त्याने अचानक का घेतला हे कारण त्याने तिला सांगितल्यामुळे तिला एक गोष्ट कळली होती, की तो प्रेम करत होता तिच्यावर मनापासून.... अगदी मनापासून... पण या घडीला त्याला अलिप्तपणे बाहेरच्या जगात वावरायचा होतं.... नातं तोडायचं तर नव्हतं, पण जोडलेलं नातं जपताना त्याची ओढाताण होतं होती बहुदा....!! तिला वाटलं, असा विचार स्वप्नात पण आपण कधी केला नव्हता... !!!!! आयुष्यात आलेल्या प्रत्येक मुलाशी आपण कायम मित्र म्हणून वागलो... मैत्रीच्या  नात्यालाच सांभाळलं ... आणि अचानक तो भेटला तेव्हा वाटलं, तो मित्रापेक्षाही कोणीतरी खास आहे आपल्यासाठी.... जवळचा मित्र आहेच तो, पण तरी तो इतरांपेक्षा आपल्या जास्तच जवळ आहे... काकंणभर जास्तच....!!!! त्याच्या नजरेत कायम वेगळा भाव जाणवतो...त्याच्या सोबत असताना खूप छान वाटतं आपल्याला... सुरक्षित वाटतं....!!!! आणि मग जुळली नाती अलगद हळुवारपणे......अचानक जुळलेली नाती..... किती बदलवून गेला तो अचानक जुळलेला नात्याचा बंध....!!!! छान वाटलं तेव्हा आपल्याला... आपल्या आयुष्यात कोणीतरी रंग भरू लागल्याचं जाणवलं... फक्त आपला विचार करणारं कोणीतरी आहे ही भावनाच आपला प्रत्येक क्षण सुंदर करत गेली..........!!!!
                      हसू आलं तिचं तिलाच.. पुन्हा जुन्या आठवणीत गुंतल्याने....!!!! तिलाच मजा वाटली आपल्या आयुष्याची... तो आला अचानक आणि गेल्या २० वर्षातला एकही दिवस इतका सुंदर नव्हता वाटला तिला... काहीतरी वेगळ होतं त्या वेड्या दिवसात.......वाट बघण्यात... वाद घालण्यात, भांडण करण्यात आणि नन्तर पुन्हा एकमेकांना समजावण्यात....!!!!! ती हुरहूर... ते वेडे करणारे दिवस... त्या बेधुंद जगात आपण होतो आणि एकमेकांशिवाय आपल्याला काही करमत नव्हतं.....!!!! काय मजा असते 'प्रेमात' ???? इतकी जादू होते एकदम की आपल्या प्रत्येक दिवसात ... आपल्या प्रत्येक क्षणात तो असतोच.... छोट्या छोट्या गोष्टीत तो कुठ्ठून तरी डोकावतोच...!!!!  
                        पण आता ???? आपल्या आठवणीत तो असेलच... आपल्या स्वप्नात तो तसाच आठवेल का आपल्याला.... ??? आपल्या आठवणीने रात्री बेरात्री अस्वस्थ होणारा... अचानक कुठेंतरी समोर येऊन आपल्याला सुखद धक्का देणारा.... आपल्या साठी काहीतरी गिफ्ट्स आणणारा... अचानक आपल्याला phone करत .... आपल्याला हट्टाने लाड करायला लावणारा... आपल्यासोबत पावसात चिंब चिंब भिजणारा, भिजवणारा....... आपल्या असण्याने खूष असणारा .... आपल्या अवतीभवती करणारा... आपली काळजी घेणारा.......आठवेल का तो असाच.......?????? आता, आपल्यापासून लांब गेल्यावर त्याला आठवतील का आपल्या छोट्या छोट्या गोष्टी........ ???? आठवतील का आपल्यासोबत घालवलेले ते क्षण... त्या क्षणांनी दिलेला आनंद... त्या गप्पा.. त्या तक्रारी.. ती बैचेनी .... ती हुरहूर जाणवेल का त्याला...???? आपल्यासारखा कधी तो पण अस्वस्थ होईल का??? आठवणीनी बेजार होऊन तो देखील रात्री शांत झोपू शकेल का??? का, मला आठवत कधी तरी डोळा लागेल त्याचा....???? तिला वाटलं, किती विचार करतो आपण त्याचा...!!! इतकं त्याच्यात गुंतलोय आपण हे आज कळतंय आपल्याला....आणखी जास्त जाणवतंय.... ते  त्याच्यापासून दूर गेल्यावर....!!!! 
              मनापासून प्रेम केलं आपण त्याच्यावर... आयुष्यात पहिल्यांदा स्वप्नं पाहिली भावी आयुष्याची त्याच्या साथीने... किंबहुना त्यानेच शिकवली ती बघायला ....आणि आता ती विसरून जायची आपण... पाटी कोरी करायची आता.... मनापासून प्रेम केल्याची ही असते का शिक्षा... ?? देवा...असंच जर करायचं होतं तर का आलो आम्ही एकमेकांच्या आयुष्यात...??? का स्वप्नं बघितली एकमेकांच्या साथीने..??? आणि आता तीच तोडायची... नवी स्वप्नं बघायची तरी का...??? कोणासाठी??? नाही वाटत आता बघावीशी अशी स्वप्नं पुन्हा....पण कोणाची तरी स्वप्नं आपण पूर्ण करावीत अशी त्या व्यक्तीची अपेक्षा असेल तर?? आपल्याकडूनच पूर्ण होणार असतील तर ती पूर्ण सुद्धा होताील.... पण मग आपल्या स्वप्नांचं काय...? ती अशीच अपूर्ण रहाणार कायमची....पण त्या अपूर्ण स्वप्नांची अशीच गोडी जीवाला वेडं लावणार.....!!!! आज ख-या अर्थाने तिला त्याओळींचा अर्थ कळला आणि नकळत डोळ्यातं आलेलं पाणी पुसत ती पण गुणगुणू लागली.." गोडी अपूर्णतेची लावील वेडं जीवा..."
   

गुरुवार, २४ मार्च, २०११

तुझे नि माझे नाते काय...????

           नातं... दोन जीवांना बांधणारं .. कधी प्रत्यक्ष निर्माण होणारं .. कधी आपणहून निर्माण केलं जाणारं ...!!! आयुष्यात कितीतरी नाती आपण बघतो , लहानपणापासून निर्माण होणारी रक्ताची नाती....शालेय वयात जुळणारी दोस्तीची नाती... नकळत्या वयात हळूवार फुलणारी प्रेमाची नाती... धीराची, विश्वासाची, रागलोभाची, हेव्याची..........!! कितीतरी नाती आपल्याही नकळत निर्माण झालेली पण तरीही काही नाती, काही बंध असे असतात कि त्यांना कोणतं  नाव द्यावं  हेच उमगत नाही, आणि मग प्रश्न पडतो, ' तुझे नि माझे नाते काय....????????'
                   तुझ्यात आणि माझ्यात असंच एक नातं आहे... अनामिक .....!!!! सर्व नात्याहून वेगळं आहे ते... खास आहे..... प्रेम, विश्वास,आदर,रुसवे-फुगवे या सगळ्यातून फुलून आलेलं आपलं हे नातं नक्कीच त्याचं वेगळेपण जाणवून देतं... आपण एकत्र घालवलेले क्षण अगदी मोजके असतील, सहज गप्पा मारत किंवा नुसते भटकत घालवलेले असतील पण तरीही त्यातून मनात आनंद  निर्माण करणारं, मनात तरतरी निर्माण करणारं काहीतरी असतं हे नक्की...!!
                 आपण कधी ३-४ दिवस भेटलो नाही,बोललो नाही, तर मग मनात हुरहूर का दाटून यावी...??? कुठेतरी मनात खोलवर कप्प्यात आठवणींनी जागं का व्हावं???? मनातल्या गोष्टी तुला कळाव्यात असं का वाटावं......??? तुझ्याशी बोलताना, तुझ्या सोबत असताना मनात चांदणं का फुलावं....???? काय आहे आपल्या नात्यात...??? तुझं नि माझं नातं काय...????
                 तुझ्या माझ्यात असणार नातं जगाच्या दृष्टीने नुसतंच मैत्रीचं असलं तरी ही ,मैत्रीपेक्षा ते जास्त खास आहे... आपल्या मनाच्या जवळीकतेचं  आहे... मैत्रीपेक्षाही सुंदर, मनापेक्षाही तरल,नाजूक असलेलं नातं .....कुठले हे नातं...?????? काय नाव त्याचं.....???
         intutions होतं काही काही वेळा आपल्याला .... एकमेकांना भेटण्याची, एकमेकांशी खूप काही बोलण्याची, एकमेकांसोबतचा सहवास enjoy करण्याची ओढ आपण कितीही नाही म्हणालो तरी जाणवतेच ...तुला वाटतं मी phone करीन आज, आत्ता आणि त्याचं क्षणी मी phone केल्यावर तुझ्या आवाजात जाणवणारा आनंद मला सगळं काही सांगून जातो.. तुझ्या मनातलं मी जणू शकले याचा आनंद मलाही होतो.. !!! असं समाधान फक्त तुझ्याशी संवाद साधतानाच का होतं...??? असा आनंद फक्त तुझ्यासोबत असताना, तुझ्याशी गोष्टी share करतानाच का होतो...?????? मोठ्ठा अनुत्तरीत प्रश्न ....... तुझं नि माझं नातं काय...???
                   वेळेचं भान होऊ न देणारं... वेळात वेळ काढून आठवणी जाग्या करायला लावणारं.... हळुवार क्षणी तुझाच आधार शोधणारं.... आनंदाच्या क्षणी तुलाही बेहोष व्हायला लावणारं.... घडोघडी तुला स्मरणारं... तुला आठवणारं... तुला चुकचुकणारं... तुझ्या छोट्याश्या message ची आतुरतेनं वाट बघणारं... तुझ्याशी कधी ही काहीही बोलायला संवाद साधायला तयार असलेलं... कुठलं हे नातं...??? काय नाव आहे या नात्याचं..???
              मनात आलं की बोलून दाखवणारं... मनात न ठेवता बिनधास्त खोलून सांगणारं... तरीही अबोल असणारं... मनातल्या मनात तुझ्यासोबत आयुष्य जगणारं... मनातल्या मनात गोड स्वप्नं रंगवणारं....प्रत्येक क्षणी तुझा हात हातात धरण्याची इच्छा ठेवणारं... तुला सावरताना स्वतःलाच सावरणारं... तुला समजावताना स्वतःलाच समजावणारं... तुला आनंदी बघताच आनंदी होणारं... तुला दुःखी बघताच दुःखी होणारं... तुझं नि माझं कुठलं हे नातं ...????? कुठले हे बंध...???
             आपल्या सहवासाने बाकी वातावरण फुलवणारं..... खडकाळ जमिनीतही ओलावा निर्माण करणारं.. फुलांच्या मनातला गाणं गाणारं... उडणाऱ्या पक्ष्याची भरारी पेलणारं... समुद्रासारखा शांत, गूढ, अथांग खोली असलेलं.. हिमालयासारखा शुभ्र स्वच्छ असलेलं... कोणत हे नातं ...??? तुझं नि माझं अबोल नातं..??? प्रेमापेक्षाही वेगळं..... पण प्रेमाने ओथंबलेलं.. आपलं नातं..??? काय आहे आपलं हे नातं...??? काय आहे...?????



रविवार, १३ मार्च, २०११

चिंब पाऊस

चिंब चिंब पावसाने, झाले तन मन ओले
थेंबाथेंबातुनी कोणी मनातले भाव बोले    
झाला पालट पालट, काय बदल क्षणात
चैतन्याचा वारा वाहे, साऱ्या जनमानसात

सारी चराचर सृष्टी, नवा तजेला लेवून
धरतीही तृप्त झाली,ओल्या ओल्या स्पर्शातून
हिरव्या रंगाची उधळण, होई पानापानातून
नव्या सृजनाची जाण, उगवत्या कोंबातून

नवनिर्मितीची असे एक अनामिक ओढ
बहरत्या ऋतूला या नसे कशाचीच तोड
बंध जुळती मनाचे अशा ओल्याचिंब वेळी
ही ओलीचिंब नाती कधी स्मरती अवेळी

पानाफुलांसवे गाती, पक्षी स्वछंदाचे गीत
नव्या पालवीसवे दाटे, एक अबोल ही प्रीत
कधी अचानक भेटे, स्वप्नातला मीत
वाटे अशा पावसात तो, असावा समीप

काळे मेघ दाटू येता, पक्षी पाही आकाशात
पिल्लांनाही जाणवे वर्षाचाहूल घरट्यात
भान विसरुनी जाती, सर पावसाची येता
पिल्ले पाखरे विहरती, ओलेचिंब होता होता

हिरव्या रानात फुलता, फुले सर्व रानोमाळ
निसर्गाचे रूप बदलण्या आला पावसाळी काळ
खळाळत्या पाण्यानेही धरला ठेका आणि ताल
रंगारंगाच्या बुट्यांची ल्याली सृष्टी हिरवी शाल




प्रत्येकाने असतं नात एक जपलेलं...

प्रत्येकाने असतं नातं एक जपलेलं...
ओल्याचिंब आठवणींनी खोल मनात दडलेलं...
कातरक्षणी डोळ्यात पाणी आणणारं..
रात्रीच्या समयी स्वप्नांच्या कुशीत शिरणारं..

प्रत्येकाने असतं नातं एक जपलेलं...
नकळत का होईना स्वतःशी जोडलेलं..
बेभान होताना भानावर आणणारं..
साद घालताच, हातात हात घेणारं...

प्रत्येकाने असतं नातं एक जपलेलं...
विस्मृतीत जाऊ म्हणता जाऊ न शकलेलं..
भावस्पर्शातून हळुवार अलगद स्मरणारं..
स्मरता स्मरता मनात चांदण फुलवणारं..

प्रत्येकाने असतं नातं एक जपलेलं...
नात्याच्या गुंत्यात कधी न गुंतलेलं...
जगण्याच्या वाटेवर दिलासा देणार..
कुणासाठी तरी काळजी करू लागणार..

प्रत्येकाने असतं नात एक जपलेलं...
मैत्री आणि प्रेमाच्या भावनेनं खुललेलं..
जाणत असून सुद्धा अजाणत बनलेलं...
बोलता बोलता अचानक अंतर्मुख होणारं...

प्रत्येकाने असतं नातं एक जपलेलं...
आयुष्याच्या धावपळीत कधी न हरवलेलं..
क्षणाच्या भेटीत युगांचा आनंद देणारं..
हुरहुरत्या क्षणी काळीज चिरत जाणारं..

एक संध्याकाळ

एक संध्याकाळ.....सैरभैर करणारी...
माणसात असून सुद्धा अगदी एकटं पाडणारी...
आठवणींच्या  क्षणांनी बैचैन करणारी..
सलणाऱ्या वेदनेला,तरी सुद्धा जपणारी...

एक संध्याकाळ...मंतरलेली..
आशेच्या किरणांनी प्रकाशलेली...
विश्वासाच्या आधारे तरारलेली..
मायेच्या छायेत बहरलेली...

एक संध्याकाळ... वेड्यागत वागणारी..
उगाचच हसवत डोळ्यात पाणी आणणारी...
स्वप्नांच्या जगात हळूच डोकावणारी...
पण  वास्तवाला मात्र  न विसरणारी...

एक संध्याकाळ... स्वप्नाळलेली....
प्रयत्नांच्या ज्योतीने उजळलेली....
अतूट नात्याने जुळलेली....
स्नेहबंधनाने मोहरलेली....

एक संध्याकाळ... घुसमटलेली.....
वेदनेच्या हुंदक्यांनी दबलेली....
भीतीच्या वातावरणात दडपलेली.....
प्रेमाची भाषाच हरवलेली.....

एक संध्याकाळ.. स्मरलेली.....
कायम मनात जपलेली....
मौनातूनही  खुललेली.....
क्षण अन् क्षण जगलेली....

गुरुवार, १० मार्च, २०११

आभाळ

आपणच जोखावे आपले आभाळ
आयुष्य व्हावे क्षणांची गुंफलेली माळ..!!
आपणच आपली शोधावी वाट
आयुष्य बनावे प्रसन्न सुंदर पहाट....!!!

आपणच आपले शोधावे गाव
खडतर वाटेवरती फुलवीत स्नेहभाव...!!!
आपणच घ्यावी आकाशी भरारी
विहरत स्वछंदपणे घ्यावी आयुष्यातील मजा खरी...!!!

आपणच आपल्याला पाहावे न्याहाळून
आठवणीतून जगावेत क्षण गेलेले सरून...
आपणच गावे आपले मुक्त गीत
जपावा स्वप्नातच मनातला मीत....!!

आपणच घ्यावी आपल्याला सुचलेली तान
आपणच जागे करावे आपले आत्मभान....
आपणच घ्यावी कधी आपल्याभोवती गिरकी
आपणच खेचावी अधूनमधून आपलीच फिरकी...!!!

आपणच पाळावीत आपल्याला दिलेली वचने
आपणच पहावीत आपल्यासाठी छान स्वप्ने..!!
आपणच व्हावे आपल्या अनुभवातून शहाणे..
आपणच ऐकावे आपल्या मनाचे म्हणणे...!!!

आपणच सावरावे आपल्या मनाला
आपणच हसावे आपल्या वेडेपणाला....!!
आपणच घडावे आपल्या मुशीतून
आपणच गोंजारावे आपल्याला आपल्या कुशीतून...!!!

आपणच ठरवावीत आपली बंधने..
जाणवावीत आपल्याला आपली स्पंदने..
आपल्यालाच कळावी आपली किंमत कधीतरी
आपल्याला ओळखण्याची इच्छा मात्र राहे अधुरी.. !!!

मंगळवार, ८ मार्च, २०११

कुणीतरी....

कुणीतरी असावं, आपल्यासोबत असणारं..
आपल्यासोबत चालताना आपल्याला सांभाळणारं..
कुणीतरी असावं, आनंदाने पाठ थोपटणारं..
पाठ थोपटता थोपटता, हुरळून जाऊ नकोस सांगणारं...
कुणीतरी असावं, दुःखात अश्रू पुसणारं..
विश्वासाचा हात देऊन मनाला सावरणारं.....
कुणीतरी असावं, नवीन प्रेरणा देणारं..
'जीवन कसं जगावं..?? हे कृतीतून दाखवणारं..
कुणीतरी असावं,आपल्याला खुदकन हसवणारं...
हसता हसता डोळ्यांच्या कडा ओलावणारं...
कुणीतरी असावं,आठवणीतून स्मरणारं..
स्मरता स्मरता मनात कायम रुंजी घालणारं..
कुणीतरी असावं, आपल्याला जीव लावणारं...
आपल्याला भेटलं नाही तर हुरहूर लावणारं..
कुणीतरी असावं,आकाशी झेप घ्यायला लावणारं..
आपल्या गगन भरारीने आनंदाने फुलणारं...
कुणीतरी असावं, आपला हेवा करणारं...
हेवा करताना का होईना,आपलाच विचार करणारं..
कुणीतरी असावं,आपल्यावर प्रेम करणारं..
आपल्याकडून मात्र प्रेमाची अपेक्षा न करणारं..
कुणीतरी असावं,आपल्यासाठी जगणारं..
आपल्या सुखासाठी मर मर मरणारं..
कुणीतरी असावं,नात्यात गुंतायला लावणारं..
गुंत्यात सुद्धा अलिप्त रहायला शिकवणारं..
कुणीतरी असावं, 'आपलं.. फक्त आपलं..' असणारं..
आपल्यानंतर सुद्धा आपल्या सहवासाला मुकणारं..
'कुणीतरी असावं आपल्यासाठी' हीच जगण्यातील आस...
असेच काही क्षण असतात आयुष्यातले खास ...!!

मन...

मनाचा खेळ अद्भुत सारा....
कितीतरी खोल विचाराचा पसारा...
खोल...खोल ...कुठेतरी गूढ गूढ वातावरण...
कशाचा अन कुठे, पत्ता नसतो क्षण अन क्षण....!!!!
कधी हसतो अचानक, कधी टचकन पाणी डोळ्यात..
काय झालं .. कसं झालं..जाणवतं मात्र मनात....!!!
मनाच्या अस्तित्वाची नाही खूण जरी.... 
भावना जाणवतात हीच नाही का ओळख खरी...??
आपला आणि मनाचा प्रवास आहे कायमचा..
कधी असा... कधी तसा... ना कधी मिटायचा....
मनाच्या कप्प्यात दडलेली गुपितचं गुपितं...
काहींची असतील उत्तरे, काही मात्र अनुत्तरीत...
मन, कधी खट्याळ... मन, कधी बाल्य...
मन, कधी आशा... मन, कधी शल्य...
मन, कधी प्रेरणा... मन, कधी यातना....
मन, म्हणजेच  जाणवणारी प्रत्येक संवेदना...!!
मन, कधी अबोल ... मन कधी उदास..
मोहरलेल मन म्हणजे  आनंदाचा ध्यास...
मनाला सावरणं.... मनाला आवरणं...
मनानेच मनाची समजूत घालण... 
'मन' म्हणजे आपण?? का आपण म्हणजे मन...????
हाच विचार करता करता, जगतो आपण
कधीतरी, कातरवेळी सलत काहीतरी मनात...
गर्दीत असून देखील आपण एकटे पडतो क्षणात...!!!
मनाच्या कप्प्यात किती मोहित भावना...
पण मनच सांगत रहात , कर याचा सामना..
मन...मन.. मन.. आहे नक्की काय कळत नाही...
जाणवत रहात कायम, पण दिसत मात्र नाही...,,!!