शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

आयुष्य म्हणजे

आयुष्य म्हणजे नाही नुसती मजा...
आयुष्य म्हणजे चुकीसाठी सजा... 
आयुष्य म्हणजे नाही नुसता एखाद्याचा हेवा... 
आयुष्य म्हणजे जपलेल्या आठवणींचा ठेवा... 

आयुष्य म्हणजे नाही नुसता सुखाचा वारा ... 
आयुष्य म्हणजे कडू दुःखाच्या धारा... 
आयुष्य म्हणजे नाही नुसती स्वप्नील दुनिया... 
आयुष्य म्हणजे भूतकाळाची अदृश्य छाया... 

आयुष्य म्हणजे नाही नुसती जोडलेली नाती... 
आयुष्य म्हणजे सोडून गेलेले सोबती... 
आयुष्य म्हणजे नाही मोरपिसारा ... 
आयुष्य म्हणजे क्षणात तुटलेल्या तारा.. 

आयुष्य म्हणजे नाही नुसत्या सोबतीची आस... 
आयुष्य म्हणजे फक्त एकट्याचाच प्रवास.. 
आयुष्य म्हणजे नाही नुसता जल्लोषाचा क्षण.. 
आयुष्य म्हणजे हरपून गेलेले तन मन 

आयुष्य म्हणजे नाही नुसत्या स्वप्नांचा  ध्यास... 
आयुष्य म्हणजे वास्तवातला अटळ प्रवास... 
आयुष्य म्हणजे नाही फक्त मोजलेले श्वास.. 
आयुष्य म्हणजे जगण्यासाठी दिलेला आधाराचा हात ... 

असेच काही द्यावे घ्यावे

असेच काही द्यावे घ्यावे ; ऋणानुबंध हे हळुवार जपावे
सहवासाच्या वेलीवरती , प्रेमाचे हे फुल फुलावे...

असेच काही द्यावे घ्यावे, शब्दांविना ही भाव कळावे...
स्पर्शातुनी हलकेच क्षणांनी उमलत उमलत बहरून  यावे...

असेच काही द्यावे घ्यावे, तुझ्यामाझ्यातील अंतर मिटावे...
स्वप्नांना साकार करण्या उंच भरारीचे सामर्थ्य मिळावे...

असेच काही द्यावे घ्यावे , फुलपाखरापरी स्वछंद जगावे...
चंदनापरी झिजता झिजता , सुगंधातूंनी विरून उरावे...

असेच काही द्यावे घ्यावे, आनंदाचे क्षण वेचावे...
दुःख भयाच्या ओंजळीतून नैराश्याचे अर्घ्य द्यावे...

' तुझं ' आणि  ' माझं ' म्हणून , खरंच काही आहे का वेगळं ?
तुझ्या आणि माझ्या अस्तित्वातच सामावलेलं आहे सगळं...

तुझे आणि माझे , शब्द संवाद चर्चा आणि वाद...
तुझ्या माझ्या मनात , शेवटी आर्त प्रेमाचीच साद ....

तुझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा शोधताना या जगात..
शोधणारी प्रत्येक वाट शेवटी पोचली माझ्याच  मनात...

तुझ्या माझ्यात न बोचला कधी ' मी ' पणाचा काटा...
तुझ्या माझ्यामुळेच गवसल्या ' आपलेपणाच्या ' वाटा...



एक पाऊल

एक पाऊल तेजाचे...
मनातल्या ध्येयाचे.. 
एक पाऊल तेजाचे... 
स्वप्नातल्या क्षितिजाचे... 

एक पाऊल तेजाचे...
अंधारातल्या  प्रकाशाचे... 
एक पाऊल तेजाचे...
उजळलेल्या ज्योतीचे... 

एक पाऊल तेजाचे... 
अविचल निश्चयाचे...
एक पाऊल तेजाचे... 
जागलेल्या आत्मविश्वासाचे .... 

एक पाऊल तेजाचे... 
उमलणाऱ्या यौवनाचे ...
एक पाऊल तेजाचे... 
सळसळणाऱ्या उत्साहाचे.... 

एक पाऊल तेजाचे... 
आत्मनिर्भर प्रगतीचे... 
एक पाऊल तेजाचे... 
आकाशी झेप घेण्याचे... 

एक पाऊल तेजाचे... 
स्वप्नातल्या जगाचे... 
एक पाऊल तेजाचे.... 
वास्तवातल्या भानाचे