चिंब चिंब पावसाने, झाले तन मन ओले
थेंबाथेंबातुनी कोणी मनातले भाव बोले
झाला पालट पालट, काय बदल क्षणात
चैतन्याचा वारा वाहे, साऱ्या जनमानसात
सारी चराचर सृष्टी, नवा तजेला लेवून
धरतीही तृप्त झाली,ओल्या ओल्या स्पर्शातून
हिरव्या रंगाची उधळण, होई पानापानातून
नव्या सृजनाची जाण, उगवत्या कोंबातून
नवनिर्मितीची असे एक अनामिक ओढ
बहरत्या ऋतूला या नसे कशाचीच तोड
बंध जुळती मनाचे अशा ओल्याचिंब वेळी
ही ओलीचिंब नाती कधी स्मरती अवेळी
पानाफुलांसवे गाती, पक्षी स्वछंदाचे गीत
नव्या पालवीसवे दाटे, एक अबोल ही प्रीत
कधी अचानक भेटे, स्वप्नातला मीत
वाटे अशा पावसात तो, असावा समीप
काळे मेघ दाटू येता, पक्षी पाही आकाशात
पिल्लांनाही जाणवे वर्षाचाहूल घरट्यात
भान विसरुनी जाती, सर पावसाची येता
पिल्ले पाखरे विहरती, ओलेचिंब होता होता
हिरव्या रानात फुलता, फुले सर्व रानोमाळ
निसर्गाचे रूप बदलण्या आला पावसाळी काळ
खळाळत्या पाण्यानेही धरला ठेका आणि ताल
रंगारंगाच्या बुट्यांची ल्याली सृष्टी हिरवी शाल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा