गुरुवार, १० मार्च, २०११

आभाळ

आपणच जोखावे आपले आभाळ
आयुष्य व्हावे क्षणांची गुंफलेली माळ..!!
आपणच आपली शोधावी वाट
आयुष्य बनावे प्रसन्न सुंदर पहाट....!!!

आपणच आपले शोधावे गाव
खडतर वाटेवरती फुलवीत स्नेहभाव...!!!
आपणच घ्यावी आकाशी भरारी
विहरत स्वछंदपणे घ्यावी आयुष्यातील मजा खरी...!!!

आपणच आपल्याला पाहावे न्याहाळून
आठवणीतून जगावेत क्षण गेलेले सरून...
आपणच गावे आपले मुक्त गीत
जपावा स्वप्नातच मनातला मीत....!!

आपणच घ्यावी आपल्याला सुचलेली तान
आपणच जागे करावे आपले आत्मभान....
आपणच घ्यावी कधी आपल्याभोवती गिरकी
आपणच खेचावी अधूनमधून आपलीच फिरकी...!!!

आपणच पाळावीत आपल्याला दिलेली वचने
आपणच पहावीत आपल्यासाठी छान स्वप्ने..!!
आपणच व्हावे आपल्या अनुभवातून शहाणे..
आपणच ऐकावे आपल्या मनाचे म्हणणे...!!!

आपणच सावरावे आपल्या मनाला
आपणच हसावे आपल्या वेडेपणाला....!!
आपणच घडावे आपल्या मुशीतून
आपणच गोंजारावे आपल्याला आपल्या कुशीतून...!!!

आपणच ठरवावीत आपली बंधने..
जाणवावीत आपल्याला आपली स्पंदने..
आपल्यालाच कळावी आपली किंमत कधीतरी
आपल्याला ओळखण्याची इच्छा मात्र राहे अधुरी.. !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा