मंगळवार, २८ मे, २०१३

डोळे.

डोळे ...मानवी शरीराचा तसं म्हंटलं तर एक छोटा अवयव... 
पण तरी त्या छोट्या डोळ्यातून उलगडतं जातं मानवी मन ..... 
माणसाच्या मनात डोकावण्याचा मार्ग त्याच्या डोळ्यातून जातो असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. 
कधी मनातली खळबळ व्यक्त करणारे...कधी हरखून गेलेले... कधी रडलेले... कधी रुसलेले... 
कधी वेड्यागत मनातला आनंद व्यक्त करणारे... कधी प्रेमात वेडे झालेले... 
तर कधी हरवून गेलेले... घाबरलेले.. गोंधळलेले .... कधी निरागस असणारे... 
कधी लटका राग दर्शवणारे... कधी डबडबलेले ... वैतागलेले ... संतापाने पेटून उठलेले .... 
कधी स्वप्नील, बेधुंद झालेले... कधी मिश्कीलपणे चमकणारे... 
कधी अस्वस्थ, अधीरतेने वाट पाहणारे... 
अशा अनेक भावछटांचे सहजसुंदर पण तितकेच वास्तव दर्शन घडवणारे डोळे मनाचा कौल दाखवतातच .....!!
आणि म्हणूनच हि दुनिया जास्त सुंदर ,लुभावणारी आहे असं मला वाटतं.... 
मौनाचा खरा अर्थ जाणायचा  असेल तर एखाद्याच्या डोळ्यात पहावं , कदाचित सहज समजून जाऊ आपण त्यातला दडलेला अर्थ .....!!!!








शनिवार, २७ एप्रिल, २०१३

अनुभव

कधीतरी असं झालंय का... की अगदी उगाचच आपलं मन हलकं हलकं झाल्यागत जाणवतं आपल्याला... असंख्य फुलपाखरं मनात रूंजी घालत आहेत असं जाणवत रहातं.... मनात उगाचच काहीतरी वेगळं, आनंदाचं भरतं आल्याच जाणवतं.... अक्षरशः वा-यावर तरंगणा-या पिसाप्रमाणे मनही अलगद उडू लागल्याचं जाणवत रहातं...अशा वेळी लबाड वारं ही येत आपल्या मदतीला... मंद मंद वारा आपल्या मनाला हलकं हलकं करू लागतो... उगाचच छान romantic गाणं गुणगुणु लागतोच आपण....वाटतं अगदी रस्त्यात असताना सुद्धा की घ्यावी एक गिरकी स्वतःभोवती आणि जगाची, आजुबाजुच्या माणसांची तमा न बाळगता बिनधास्त आपला आनंद व्यक्त करावा....... खरतरं आपल्या आयुष्यात तसं तर काहीच खास घडलेलं नसतं पण तरी वाटत रहातं की काहीतरी खास वाटतयं आज...!!!!!!!! काहीतरी वेगळंच वाटतयं...!!!! आपल्याला जाणवतयं ते जगाला ओरडून सांगावसं वाटू लागतं... मनातलं हळूच डोळ्यातून चमकू लागतं आणि मग चेह-यावर एक गोड हसू येतचं आपल्या... खरं खरं अगदी असंच होत ना..??????? छान वाटत ना तेव्हा....!!!!. किती वेगळाचं पण आल्हाददायी असतो ना तो अनुभव....????
Sometimes, things just happen so unexpectedly and quickly that you dont even get time to express the true emotions for that perticular moment.... you try to speak up but still you didnt get words to express them....... though the words never come out , but in mind, so many things continuously going on....... making you realise that you have conversation with your mind ..... one with positive way and other with negative..........you just try to keep yourself calm, cool and try to face it with all your strength, making yourself very strong and realise that you have most strongest mind..... and become satisfied because whatever experience you have gone through, made you strong, more mature and taught you something......

मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१३

प्रेम


आपण प्रेम केलं... म्हणजे काय झालं..???
आपल्या मनाचं नाजूक फुल झालं...
आपण प्रेम केलं... म्हणजे काय झालं..???
आपल्या विचारांचं उडतं फुलपाखरू झालं...
आपण प्रेम केलं... म्हणजे काय झालं..???
आपल्या माणसाचं मोल, आपण जाणलं....
आपण प्रेम केलं... म्हणजे काय झालं..???
आपल्या भावनांचं आपण अर्पण केलं....
आपण प्रेम केलं... म्हणजे काय झालं..???
आपल्या सर्वस्वाचं आपण दान केलं....
आपण प्रेम केलं... म्हणजे काय झालं..???
आपल्या विश्वात कोणीतरी ‘खास’ झालं...
आपण प्रेम केलं... म्हणजे काय झालं..???
छोट्या छोट्या गोष्टीतून कोणीतरी स्मरलं...
आपण प्रेम केलं... म्हणजे काय झालं..???
आठवणी स्मरताना मन मोहरून गेलं...
आपण प्रेम केलं... म्हणजे काय झालं..???
आपल्या स्वप्नांचं कोणीतरी वाटेकरी झालं...
आपण प्रेम केलं... म्हणजे काय झालं..???
शहाण्यागत वागताना मन वेड्यागत झालं...
आपण प्रेम केलं... म्हणजे काय झालं..???
आपण आपल्या जगण्याचं सोनं केलं....

मैत्री

मैत्री आपली ह्रदयात वसली
कधी सावली, कधी उन्हात तापली
कधी फुलासवे, काट्यात रूतली
तरी तुझी मैत्री मी मनात जपली

मैत्री आपली क्षणात जुळली
मनामनाची ओळख पटली
कधी दुरावा, कधी साधत जवळीक
उमगले नाते तुझ्यामुळे अधिक

मैत्री आपली भावनांची गुंफण
कधी हास्याचा कधी कातरक्षण
कधी निरागस अल्लड मन
कधी मात्र घनगंभीरतेपण....

मैत्री आपली जगण्यातला सूर
कधी हलकीशी तान मधूर
कधी आर्त कधी स्वर मंजूळ
कधी नुसत्या लकेरीचे खूळ

मैत्री आपली पाऊस गाणी
कधी रिमझिमत्या थेंबाची सर
कधी बेभान, कधी गर्जत बरसात
कधी हळव्या क्षणी अबोल साथ

मैत्री आपली आनंदाचा ध्यास
कधी शांत, निःस्तब्ध सहवास
कधी हुरहुर, कधी नुसता भास
कधी भेटीची लागे आस

मैत्री आपली अतुट विश्वास
कधी न संपणारा जीवन श्वास
राखून ठेवलेला चिमुकला घास
आठवणींनी जागवलेली रात्र खास

मैत्री आपली हक्काची साद
कधी स्वगत, कधी संवाद
कधी उगाचच घातलेला वाद
कायम मनात जपलेली याद....




शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१३

इंद्रधनू

एखादा क्षण... मन उजळवून टाकणारा...
एखादा क्षण...मन अंधारून टाकणारा...
एखादा क्षण...मन मोहरून टाकणारा...
एखादा क्षण...मन मारून टाकणारा...
एखादा क्षण...मन भरकटवणारा...
एखादा क्षण...मनाला दिशा देणारा...
एखादा क्षण...मन खाईत ढकलणारा...
एखादा क्षण...मन सावरणारा...
एखादा क्षण...विश्वास सार्थ करणारा...
एखादा क्षण...विश्वासघात करणारा...
एखादा क्षण...मनाला भावलेला...
एखादा क्षण...मनात जपलेला...
एखादा क्षण...मनात सलणारा...
एखादा क्षण...मनाला समाधान देणारा...
एखादा क्षण...मनाला गगनाची ओढ लावणारा..
एखादा क्षण...मनाला समुद्राची अथांगता देणारा..
एखादा क्षण...स्वप्नांच्या दुनियेत नेणारा...
एखादा क्षण...वास्तवतेचं भान देणारा...
एखादा क्षण...आपल्याला आपली ओळख करून देणारा...
एखादा क्षण...ख-या मैत्रीची जाणीव करून देणारा...
एखादा क्षण...नात्यांना अनुभवणारा...
एखादा क्षण.. अचानक परका बनवणारा..
'आयुष्य' अशा अनेक क्षणांचा पसारा...
जो रंगवतो जीवनातील इंद्रधनू सारा....!!!

क्षण...

क्षण हसरा.... क्षण नाचरा...    
क्षण फुलता मोगरा...
क्षण सरता..  क्षण स्मरता...  
क्षण पैंजण रुणझुणता...
क्षण निराशा.. क्षण आशा...
क्षण ऊनपावसाचा खेळ खाशा...
क्षण हलका...  क्षण फुलका...
क्षण चेहरा बोलका...
क्षण कावरा... क्षण बावरा...
क्षण झुलता मनोरा...
क्षण प्रेमाचा... क्षण  मिलनाचा...
क्षण बावरत्या मनाचा...
क्षण  मनात.... क्षण स्वप्नात...
क्षण निसटत्या स्पर्शात....
क्षण  भावनांचा.... क्षण वासनांचा....
क्षण सावरत्या मोहाचा....
क्षण  उद्रेकाचा....  क्षण  कल्लोळाचा...              
क्षण घुसमटत्या वेदनेचा....
क्षण  विरहाचा...  क्षण निरोपाचा...                
क्षण अंतर्यामी नादाचा....

14 फेब्रुवारी..... valentine day…!!!!!!!!!


प्रिय चित्तचोरा
प्रेमा.......
        14 फेब्रुवारी..... Valentine day… तुझा दिवस !!!!!!!!! प्रेमाची जाहिररीत्या देवाणघेवाण करण्याचा दिवस.... प्रेमाला प्रेमाने साद घालण्याचा, आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत तो दिवस व्यतीत करण्यासाठी केलेलं planing, केलेल्या gifts and flowers ची arrangement.... सगळं जग आणि तरूणाई या दिवसाने पूर्ण झपाटून गेलेली.....!!!! या दिवसासाठी आतुरतेने वाट बघणा-यांची धांदल.... मनातली गुपितं कळू नयेत म्हणून चाललेले प्रयत्न.... पण तरीही कुठेतरी मनात या दिवसाचा विचार चाललेला.... बघताना खूप मजा वाटते. जगण्यात प्रेमाला किती महत्व आहे हे मात्र जाणवतं, पटतं की प्रेमाशिवाय जगणं किती मुश्कील आहे......!!!!
   प्रेमा, तुझा रंग कसा??? व्यक्ती-व्यक्तीगणिक प्रेमाचा रंग बदलत जातो. आई-बाबांचं मुलांवरचं प्रेम... बहीण-भावातील भांडणं होऊन सुद्धा असलेलं प्रेम.... मित्र-मैत्रिणींमधलं जवळकीतून निर्माण झालेलं प्रेम... आजी-आजोबांचं नातवंडांवरचं प्रेम....कधी नुसत्या ओळखीतून , सहवासातून निर्माण झालेल्या नात्यातील प्रेम...किती वेगळी रूपं....!!!???? पण त्या प्रत्येक रूपातील प्रेम आपल्या आयुष्यात किती वेगळे रंग भरतं आणि आपल्या जगण्याला सुंदर, मोहक बनवतं अगदी आपल्याही नकळतं.....!!!!!
   ‘प्रेम’ या शब्दातचं किती जादू दडली आहे...अडीच अक्षरं पण त्यातल्या अर्थाला असणारं महत्व एखाद्याच्या आयुष्यात किती बदल घडवू शकतं....!!!!! किती उलथापालथ होते या एकाच शब्दाने... त्यातील भावनेने....!!! ‘जग सुंदर आहे’ हे कधी डोळे उघडे न ठेवता वावरणा-यांना अचानक जग इतकं सुंदर वाटू लागतं.... पुन्हा नव्याने जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी अनुभवू लागतो मग आपण.... फुलांची मोहकता, त्यांचे रंग नव्याने जगण्यातले रंग भरू लागतात... मोकळं आकाश, निळ्या रंगाचे निरभ्र आकाश, चंद्र आणि त्याच्या विविध कला, वा-याची झुळूक , हिरवाईने नटलेला निसर्ग.... या सर्वातून कोणीतरी आठवू लागतं... कोणाला तरी आपण या सर्व गोष्टी बघताना, अनुभवताना खूप miss करू लागतो...!!!
      पाडगावकरांनी खूप छान शब्दातं वर्णन केलं आहे, आपल्या अशा फुललेल्या अवस्थेचं... ‘प्रेम केलं म्हणजे आपण फुलून आलो’ ही ओळचं आपल्या जगण्यातला मोठा बदल, आणि तो देखील खूप छान, तरल भावनांचा बदल...!!! जगण्यातील मौज अशा वेळी आपल्याला जाणवू लागते, कारण कोणीतरी आपल्यावर खूप प्रेम करत असतं... काही आठवणी, काही गप्पा, काही मिश्कील घटना मनात रेंगाळत रहातात... ‘’असं झालं असतं, तर तो/ती असं म्हणाली असती.’’ असा विचार मनात येतो आणि मग मन पिसासारखं हलकं होऊन तरंगू लागतं... फुलपाखराप्रमाणे आठवणींच्या फुलांवर बागडू लागतं....!!!
         सच्चं प्रेम असेल तर आयुष्यातले रंग अधिक गहिरे होऊ लागतात... त्यात समजुतीची, मायेची, स्पर्शाची, अबोल्याची , लटक्या रागाची चव असेल, तर त्या प्रेमाची गोडी वाढतचं जाते. आयुष्यात रंगत आणते. आपल्या भावना जाणणारं, आपली काळजी करणारं, आपली विचारपूस करणारं, आपली कदर करणारं, ‘आपलं’ म्हणणारं आणि फक्त आपल्यासाठी असणारं कोणीतरी असावं ही भावना तारूण्यात प्रत्येकजण मनात जपून ठेवत असतं,,, पण असं कोणी मिळालं की त्याच्या आनंदाचं, जगण्याचं निमित्त किती कारणांनी फुलतं, उमलू लागतं....!!! अशी ही मजा ‘प्रेमाची’....!!!
 वेडं करणा-या... जगाचं, वेळेचं भान विसरायला लावणा-या... स्वप्नाणना सजवणा-या..मनात भावी आयुष्य फुलवणा-या प्रेमा...!!! तुझा रंग किती हवाहवासा...मनाला भावणारा, भुरळ पाडणारा... मोहून टाकणारा....!!! प्रेमा, तुझ्या या स्वभावगुणामुळेच जगात आजही ‘माणूसपण’ आहे... निरागसता, आनंद, सुखाची बरसात आहे.. नैराश्यातही प्रकाशाची आशा आहे.. तुला अनेक वर्षांचं आयुष्य लाभो आणि तुझ्यामुळेच अनेक आयुष्यांचं सोनं होवो हीच सदिच्छा....!!!
                                                        तुझ्या प्रेमात पडलेली...