मंगळवार, ५ मे, २०२०

                        आज खरंतर 'त्याला' खूप बरं वाटत होतं .... कोरोनामुळे का होईना सगळेच 'त्याच्यासोबत' सध्या घरीच होते... !! लोकं खरंतर ह्या सगळ्या परिस्थितीत आता कंटाळून गेले होते, वैतागले होते पण त्याला मात्र खूपच बरं वाटत होतं ... नाहीतर, अनेकदा त्याला सकाळी सोडून जाताना कोणालाही त्याच्याकडे पाहायला वेळ नव्हता फारसा... !! मुंबई मध्ये तर वेळेला फार महत्व ...!! एक ठरलेली ट्रेन चुकून सुटली हातची, तर मग झाला सगळा घोळ सुरु...!! त्यामुळे ते सगळं टाळण्यासाठी सकाळी सकाळी पटापट आवरून जाणाऱ्या त्यांना बघून, त्याला मात्र वाईट वाटायचं... नाही म्हंटल तरी 'तो' त्यांच्या सोबत कायम असायचाच पण त्याच्यासाठी ह्यांच्याकडे मात्र वेळ फक्त शनिवार रविवारी, किंवा कधी एखादा बँक हॉलिडे ...! पण प्रत्येक weekend ला त्याचे लाड होतीलच असं मात्र नव्हतं ...! सध्या मात्र त्याचे भरपूर लाड चालू आहेत, काळजी घेतली जात आहे असा त्याला वाटत होतं ... !!!
             त्याला आठवलं पहिल्यांदा त्यांची आणि 'ह्याची' भेट झाली तो क्षण...! तेव्हाचा त्याचा अवतार आठवून खरंतर त्याला आता अगदी शरमल्यासारखं झालं. तो तेव्हा इतका छान दिसत नव्हता, विस्कटलेला अवतार होता खरंतर त्याचा, पण तरी कुठेतरी एक छान प्रसन्नता जाणवली होती त्यांना,त्याला पाहिल्यावर...!!!  इतके दिवस एकटाच असल्याने त्याच्या विस्कटलेल्या अवतारातले रूप त्यांना वेगळे नाही वाटले...! त्यांना पाहिल्यावर, त्याच्या मनात सुद्धा नकळत कुठेतरी त्या दोघांशी आपले काही बंध आहेत असे वाटून गेले... !! नाहीतर इतक्या दिवसात कोणी आपल्याकडे ढुंकून पाहायला तयार नव्हतं आणि अचानक हे दोघे आपल्या समोर आलेत आपल्याला पाहायला हे जरा त्याच्यासाठी सुखावहच होतं...!!! त्यांना तो आवडला तशाही अवतारात...! "एकदा का तो  लागला आपल्यासोबत रहायला की आपोआप होईल त्याच्यात बदल" असा त्यांनी विचार बोलून दाखवल्यावर तर त्याला कित्ती आनंद झाला होता...! म्हणजे आता हे आपल्यासोबत राहणार...!!!! मस्त मज्जा...!!!! त्याला पण खूप दिवसांनी एकदम छान वाटलं...!!
                थोड्याच दिवसात त्याला भेटायला  आणखी काहीजण, त्यांच्यासोबत येऊन गेले...!! त्यांनाही तो आवडला, पाहताच क्षणी त्यांचे डोळे आनंदून गेल्याचे त्याला आठवले. म्हणजे हे पण ह्यांचेच जवळचे नातेवाईक दिसत आहेत असा विचार त्याच्या मनात आला.. त्याला बरं वाटलं, की चला आता आपल्याला खूप सारे नातेवाईक असणार आहेत तर....!!!
                      मग सगळे सोपस्कार झाल्यावर, एकदाचे ते दोघे आणि तो एकत्र राहू लागले...!! अधूनमधून ही पाहूणी मंडळी येत जात असत. पहिल्या  पहिल्यांदा त्यांना आणि 'त्याला' एकमेकांची सवय व्हायला जरा वेळ लागला . कारण ती दोघे कामावर जाणारी, त्यामुळे दिवसभर 'त्याला' करमेनासे होई... त्यांच्यातली ती, कॉलेज मध्ये प्राध्यपिका असल्याने कधी सकाळी लवकर जात असे आणि दुपारी  येत असे, कधी उशीरा जाऊन संध्याकाळी येत असे... तर त्यांच्यातल्या   त्याचं ठराविक टाईम टेबल होतं, सकाळी ८;३० ला जाऊन संध्याकाळी ६ वाजेपर्यत तो परत येत असे. त्यामुळे तिच्यासोबत 'त्याचंही' routine flexible ठेवलेलं होतं तिने..!! मग कधीतरी सुट्टी असेल तर ते दोघे त्याचे लाड करायचे.. शक्यतो त्याचा अवतार नीट करायचे... तो प्रसन्न असला की  त्यांनाही छान वाटायचे...! हळू हळू त्या तिघांचं  routine लागू लागलं.. !! पण मुंबईच्या ट्रेन प्रवासात कधी ना कधी उशिरा येणं, auto किंवा बस यांचे संप होणं  असा काहीबाही होत असे आणि मग त्यांना कधी अपेक्षेपेक्षा उशीर झाला की  त्याला मात्र राहून राहून कंटाळा येत असे...!! तशी त्यांना त्याची काळजी असायची, कारण त्याच्यासोबत त्यांनी जमेल तसा वेळ घालवायला सुरवात केली होतीच, नवीन काही कल्पना वापरून त्याचं रूपडं खुलवायला सुरवात झाली होती..! पण जमेल तशी हळूहळू चालली होती गाडी..!!
           दमूनभागून परतल्यावर त्यांना त्याच्यासोबत अतिशय शांत आणि सुखावह वाटू लागलं होतं. आपल्या हक्काचं कोणीतरी आहे हा विश्वास 'त्याला' आणि त्या दोघांना पण जाणवू लागला होता. त्या दोघांपैकी तिला तर त्याची सोबत खूपच मोठा आधार वाटत होती. कारण तो कधी कधी ऑफिसच्या कामासाठी कुठे बाहेरगावी गेला, तरी 'तो' सोबत असल्याने तिला बरं वाटतं असे. तसं म्हटलं तर तिचा काॅलेज व्यतिरिक्त बराचसा वेळ त्याचं करण्यात जायचा, त्यामुळे नकळतच तिचं आणि त्याचं नातं जरा जास्तच घट्ट झालं होतं. त्यामुळे आईकडे माहेरी गेली तरी तिला फार करमत नसे.
     त्याच्याशी जास्त संबंध यायचा तो शनिवार रविवारी...!! एरवी तो तसा दिवसभर ऑफिसमध्येच, संध्याकाळी आला की मात्र असायचा.... पण गंमत अशी की त्या दोघांपैकी ती जरा जास्त बडबडी, काहीबाही करत राहणारी.... तो मात्र तसा मुळातच शांत, कामं करताना पण सगळं शांतपणे करणारा, तिचं मात्र काम करताना मध्येच गाणं गुणगुणणं, काहीबाही त्याला सांगणं चालतं असे. त्यामुळे काही कारणाने ती माहेरी रहायला गेली तर आम्हा दोघांना करमत नसे..!! तिची बडबड, गप्पा, गाणी इत्यादी अनेक गोष्टींची सवय झाल्याने शांत असणा-या त्याच्यासोबत रहाताना काय करावं कळत नसे.
    पण सध्या  तो पण घरून काम करत असल्याने 'त्याला' दोघांचा सहवास लाभला होता. खूप छान वाटतं होतं त्याला....!
       गेल्या काही वर्षात आपल्याबद्दल त्यांच्या मनात किती काळजी आहे  हे 'त्याने' अनेकदा अनुभवले होते. पावसाळ्यात आपली अवस्था पाहून ती दोघं किती काळजीत होती...!! आपल्याला कुठे काही झालं तरी लगेच काही करता येईल का असं बघणारे ते दोघे त्याच्यासोबत जोडले गेले होते.
     असे हे दिवस आणखी काही काळ तरी आपल्या आयुष्यात आहेत ह्याचा आनंद त्याला, त्या 'घराला' झाला. मुंबई सारख्या ठिकाणी आपल्या हक्काच्या घरासाठी स्वप्न तर सगळे बघतात, पण एकदा ते घर झालं की त्याच्यासोबत काही ठराविक काळचं राहणं शक्य होतं नोकरीच्या आणि धकाधकीच्या जीवनात...! पण आज मुंबई काय पण जगातला प्रत्येक जण आपापल्या घरात आहे त्या प्रत्येक घराची अशी कमी अधिक प्रमाणात सारखीच असणारी ही गोष्ट ..!!!
   
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा