आजचा लोकसत्ता वाचताना एका अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय निराशाजनक बातमीने माझ्यासमोर असंख्य विद्यार्थी आणि त्यांच्या भवितव्याचा विचार मनात आला... मुंबई विद्यापीठ हे अतिशय नावाजलेले आणि जागतिक दर्जा प्राप्त असलेले, एक शैक्षणिक उपक्रम राबवणारे विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध ...NAAC कडून 'अ ' दर्जा प्राप्त असणारे विद्यापीठ....!!! पण गेले काही दिवस मुंबई विद्यापीठाच्या अनेक गोंधळांमुळे एकूणच त्याची झालेली दयनीय परिस्थिती पाहता मला हा लेख लिहावासा वाटला ... या सर्व गोंधळातून अनेक प्रश्न मनात आले , ज्यांची उत्तर शोधून सापडतील असे वाटत नाही.
आजची बातमी " चार दिवस महाविद्यालये बंद....!!! " '' शिकवा नंतर; आधी वेळेत मूल्यांकन.... विद्यापीठाचा प्राध्यापकांवर रेटा ''
मुंबई विद्यापीठाच्या तिसऱ्या वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचे जीव सध्या टांगणीला लागलेले असावेत... कारण अजूनही त्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत... विद्यापीठाने ह्या वर्षी online पद्धतीने उत्तरपत्रिका तपासण्याचा घाट घातला होता. online पद्धतीने निकाल लवकर लावला जाईल असा विश्वास कुलगुरूंना वाटत होता परंतु झाले उलटेच..!!! त्याचा परिणाम आज असा दिसत आहे की दिलेल्या मुदतीत निकाल लागणे अशक्य झाले आहे... नागपूर सारख्या विद्यापीठाची मदत घेण्याबाबतही विचार झाला असल्याचे बातमीमधून कळले परंतु तरीसुद्धा निकाल दिलेल्या तारखेला (३१ जुलै ) लावणे अशक्य दिसत आहे. त्यामुळे आता मुंबई विद्यापीठाच्या सुपीक डोक्यातून एक नवी कल्पना निघाली आहे. महाविद्यालयांना चार दिवस अध्ययन सुट्टी देण्यात आलेली आहे. प्राध्यापकांना आपल्या महाविद्यालयामधील अध्यापन सोडून उत्तरपत्रिका तपासण्यासाठी 'सोमवार ते गुरुवार' म्हणजेच (२४ जुलै ते २७ जुलै ) असे चार दिवस ही सुट्टी दिलेली आहे . परंतु तरीही निकाल वेळेत लागणार का? हा प्रश्न राहतोच...!!
शैक्षणिक सत्रांवर या सर्व गोंधळामुळे नक्कीच परिणाम होणार आहे. एक तर निकाल उशिरा लागल्याने पुढील उच्च पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक तर बदलेलच: परंतु सध्याच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम सुद्धा सूत्रानुसार होणार का??? हा आणखी एक मुद्दा उपस्थित होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात नव्याने काही गोष्टी करण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे; परंतु तो सुरु करताना ' त्याचे होणारे दूरगामी परिणाम आपण लक्षात घेतले पाहिजेत' हा साधा सरळ विचार आपल्या कुलगुरूंनी आणि त्यांच्या समितीने करणे गरजेचे होते असे मला वाटते. मुंबई विद्यापीठात तृतीय वर्षाचेअसणारे एकूण विद्यार्थी आणि प्रत्येक विषयावर असणारी त्यांची एकूण संख्या, त्यानुसार एकूण उपलब्ध असणारी प्राध्यापकांची संख्या ह्या सगळ्याचा एक ताळमेळ लक्षात घेणे गरजेचे होते. offline आणि online पद्धतीने मुल्याकंन करताना किती वेळ लागतो, किंवा किती वेळ लागू शकतो ह्याचा तुलनात्मक विचार करणं गरजेचं होतं आणि आहे. त्यानुसार एखाद्या विषयाचे विद्यार्थी; ज्यांची संख्या कमी आहे अशा विषयाच्या उत्तरपत्रिका प्रायोगिक तत्त्वावर online पद्धतीने मुल्यांकित करून पाहणे गरजेचे होते. यातून एक उत्तरपत्रिका online पद्धतीने मूल्यांकन करण्यासाठी साधारण किती वेळ लागतो ह्याचा अंदाज आला असता. तसेच प्रत्येक प्राध्यापकाला ठराविक उत्तरपत्रिका मूल्यांकन करून द्याव्या लागणार आहेत, परंतु आपल्याकडील तांत्रिक यंत्रणा तितकी पुरेशी आहे का? तितकी परिणामकारक आहे का?? ह्या सर्व गोष्टी सुद्धा लक्षात न घेतल्याने विद्यापीठाचा एकूणच असलेला ढिसाळ कारभार आणि कामाचा दर्जा कसा आहे हे दिसून आलेले आहे. अशा अनेक गोष्टी अनेक वेळा दुर्लक्षित केल्या जातात परंतु त्या दिसताना छोट्या असल्या तरी त्यांचा होणार परिणाम हा खूप मोठा असतो. आणि ह्या सर्वातून एक गोष्ट ठळकपणे जाणवली ती म्हणजे NAAC द्वारे केले जाणारे दर्जात्मक मुल्यांकन....!!!!
NAAC द्वारे दर पाच वर्षांनी विविध विद्यापीठे आणि त्यातील विविध महाविद्यालये यांचे मूल्यांकन केले जाते . हे मुल्यांकन विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेच्या अभ्यासक्रम, सोयीसुविधा, संशोधन, विद्यार्थी संख्या आणि त्यांच्यासाठी तसेच प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी केल्या जाणाऱ्या विविध सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपयुक्त उपक्रमांवर आधारित असते. परंतु अनेकदा असे दृष्टिपथास येते कि मूलभूत सोयी सुविधा नसतानाही अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांना 'अ ' दर्जा प्राप्त झालेला असतो. माझ्या वैयक्तिक अनुभवात अशी उदाहरणे मी जवळून पाहिली आहेत. कारण NAAC समिती सर्व गोष्टी कागदोपत्री पाहते. महाविद्यालयाच्या कामकाजाची पद्धत आणि एकूण प्रगती खरीच कागदोपत्री जशी दर्शवली आहे तशी आहे का? हे पाहणे गरजेचे आहे, परंतु अनेकदा विद्यापीठाच्या किंवा महाविद्यालयाच्या पूर्वपुण्याईवरून सध्य स्थितीतही त्या संस्थेस उत्तम दर्जा दिला जोडतो... हे कितपत योग्य आहे? त्यामुळे NAAC समिती सुद्धा खरचं काय मुल्यांकन करते आणि कोणत्या आधारावर करते हा एक प्रश्न पडतोच जेव्हा 'अ ' दर्जा असणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा असा ढिसाळ कारभार दिसू लागतो तेव्हा...!!! त्यामुळे आता तरी आपण काही ठोस भूमिका घेत आपल्या शिक्षण संस्था, त्यांचे ढिसाळ आणि गलथान कारभार यांवर अपेक्षित बदल करणार का? आणि आपल्या अनेक भावी पिढ्यांचा होणारा शैक्षणिक बट्याबोळ थांबवणार का ???
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा