गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

                                       तो कधी तिच्या आयुष्याचा भाग झाला हे तिलाच आठवेना ...!! आज.. अचानक भेटला तो तिला... आणि भेटल्यावर तिला काय बोलावं हेच कळेना... कारण ज्या शेवटच्या क्षणी तिने त्याला पाहिलं होतं , ते त्याच्या लग्नात...!! त्याचं लग्न...! ठरलं ते पण इतकं अचानक कि तिलाच काय त्यालाही ते पचवणं खूप अवघड झालं होतं ....  कारण त्याच्या स्वतःच्या लग्नाचे खूप सारे plans  तिने ऐकले होते, त्याच्याकडून त्याच्यासारखेच hi fi style चे ... AC हॉल असेल.. भरपूर पाहुणे, मित्रमैत्रिणींचा गोतावळा आणि त्याच्या friend circle साठी वेगळी व्यवस्था .... खाणं पिणं  दोन्ही असणार ... दणक्यात party  असेल... असं आणि तसं...पण त्याचं लग्नच इतक्या घाईने ठरलं की या सगळ्या plans चा विचार म्हणजे एक स्वप्नचं राहिलं ...!! त्याची त्यावेळी झालेली स्थिती , सैरभैर  होऊन गेलेला तो , दोन्ही बाजूने पुरता अडकून गेलेला तो, कारण त्याच्या मनाविरुद्ध थोड्याश्या घाईने लग्न ठरवलं गेलं आणि तेही त्याला विशेष न पटलेल्या मुलीशी .... त्याची ती अस्वस्थ रूपं तिला आजही स्पष्ट आठवली... त्याची मानसिक तयारी नव्हती या लग्नाला.. त्याची त्याने रंगवलेली काही स्वप्न होती जी त्याला जगायची होती मुक्तपणे.... पण घडत असलेल्या गोष्टी वेगळ्याच होत्या .. त्या काळात आपण त्याला सोबत केली... धीर दिला आणि नव्याने होणाऱ्या बदलाचं स्वागत त्याने शांतपणे , धीराने करावं हा विश्वास दिला... आपल्या दुःखाला , त्याच्या समोर व्यक्तही होऊ दिलं नाही  ....!!! मात्र त्या दुःखाची तीव्रता कायम जाणवत रहाणार हे मात्र कळून चुकलं होतं तिला   ... लग्नाच्या दिवशीसुद्धा त्याच्यासोबत त्याची खास मैत्रीण म्हणून ती शेवटपर्यंत होती .... मात्र त्यानंतर त्याच्या आयुष्यातून कायमचं दूर निघून गेलो आपण... त्यानेही त्यानंतर वर्षभरात कधी आपल्याला phone किंवा message केल्याचं नाही आठवत तिला... नंतरच्या काळातही त्याचा आणि तिचा संबंध येण्याचा प्रश्न नव्हताच. मधल्या काळात अनेक गोष्टी घडल्या आणि त्यातली एक म्हणजे  तिचं  लग्नं ... लग्नानंतर ती मुंबई मधील उपशहरात राहायला गेल्यावर तर तिचा आणि त्याचा संपर्क होणं अवघडच होतं ... ती  सुद्धा  हळूहळू  आपल्या  संसारात रमू लागली... नव्या संसारात घर आणि नोकरी सांभाळत कसे दिवस जाऊ लागले  सुद्धा कळलं नव्हता... आणि आज अचानक भेटला तो तेव्हा तिला जाणवलं कि ह्याला आपण आजही मनात कुठेतरी तसंच  जपून ठेवलंय  की ...!!!
                               तिला वाटलेलं की तो विसरला आपल्याला ... रमला बहुदा संसारात त्याच्या .... !!!  ह्या विचाराने तिला आनंद आणि दुःख दोन्ही वाटत होतं ... आनंद यासाठी की तो त्याच्या संसारात  सुखी आहे , ज्या कारणासाठी त्याच्यापासून दूर व्हावं लागलं  त्याचा फायदा झाला आणि दुःख यासाठी की 'इतक्या पटकन तो विसरला सुद्धा आपल्याला???'
                               पण  आज अचानक त्याला समोर बघून तिला काय बोलावं हे कळेना... उलट तो अचानक असा भेटलाय  यावरच तिचा विश्वास बसेना ... अजूनही तसाच दिसतोय तो... डोळ्यात तेच मिश्किल भाव.. तीच hair style , सगळं तेच ... मात्र लग्न झाल्याने बोलण्यात आलेला थोडा समजूतदारपणा... तो बदललाय , पण पूर्णपणे नाही... बदल झालाय पण तो आतून, जणू घडलेल्या घटनांतून शहाणा झाल्यागत . तिला खूप बरं वाटलं . तो विचारपूर्वक वागतोय हे ही  जाणवलं तिला...!!!
                                त्याच्यासोबत hi hello गप्पा चालू झाल्या खऱ्या... खूप दिवसांनी भेटल्यावर एक विचित्र    अवघडलेपण आल्याचं जाणवलं  तिला... त्याला मात्र खूप काही बोलायचं होतं  हे जाणवत होतं ..... तो बोलता   बोलता  म्हणाला , ''सगळं आहे , पण तू मात्र जवळ नाहीस, फार वेगळं वाटतं तुझ्याशिवाय जगणं ''.... she was surprised ..... इतक्या वर्षांनी भेटल्यावर सुद्धा , पहिल्याच भेटीत त्याने मोकळेपणे सांगून टाकलं काय होतंय त्याच्या मनात... !!! त्याचा हाच  स्वभाव तिला आवडला होता. त्याचं  वागणं , बोलणं काहीवेळा इतकं साधं असायचं की तो नक्की हाच आहे ना ? असा विचार तिच्या मनात यायचा. आजही किती पटकन त्याने सांगितलं त्याच्या मनातलं , त्याच्या आयुष्यातलं एक खरं सत्य ...!!
                               तिला वाटलं, सांगावं का आपणही त्याला कि तुझ्याशिवाय मी कशी जगले.. जगत आहे ते...?   ज्यांचा  कधी विचार पण मनात आला नाही असे क्षण जगताना होणारी तगमग, त्रास, चिडचिड, हतबलता आपण कशी सहन केली आणि पुन्हा एकदा नव्याने आयुष्याची सुरवात केली.... त्याच्याशिवाय जगावं लागेल हा विचार सुद्धा  तिने मनात नव्हता आणला कधी... तो कायम सोबत होता तिच्या ...मनात, हृदयात खोल रुतून बसलेला...!   त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण जणू आयुष्य देऊन गेला होता तिला... एक नवं आयुष्य ...!! त्या क्षणांचा गोडवा , त्या क्षणांची जादू आजही तिच्या मनावर होती... 'प्रेमाने सगळं जग बदलून जात' हे तिने ऐकलं होतं अनेकवेळा; पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव तिने त्याच्या प्रेमात पडल्यावर घेतला होता ... जणू स्वर्गलोकात असल्याचा भास तिला होत होता. त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येकक्षण तिने जपून ठेवला होता.. त्या क्षणांनी तिच्या आयुष्यात किती सुंदर स्वप्न रंगवली होती... ती स्वप्न खरी होतील हा विश्वास होता तिचा , कारण स्वप्न दोघांनी मिळून पाहिली होती. मात्र  त्याने अचानक साथ सोडली अन, स्वप्न तशीच थिजून गेली.. तिला वाटलं, सांगावं ओरडून त्याला की किती रात्री आपण रडलो... किती दिवस आपण तळमळत काढले, मनाला कसं  सावरत राहिलो... उशीचा अभ्रा अन, रात्रभर रडून लाल झालेले आपले डोळे यांचा एक घट्ट नातं झालं होतं त्या काळात .. त्याच्या आठवणींनी जागवलेल्या रात्री तिला नकोशा होत असतं.. त्या काळी दिवस संपू लागला की एक अनामिक भीती तिच्या मनात दाटू लागे... कारण आठ तासांच्या त्या रात्रीच्या प्रहरी मनात होणारी कालवाकालव तिला जाणवत असे. अन  मग बैचेन करणारी ती  रात्र आणि रात्रीची शांतता तिला आणखीनच एकटी करून जात असे.... डोळे मिटले की डोळ्यांसमोर त्याच्यासोबत घालवलेले असंख्य क्षण नाचू लागत. त्या आठवणी तिचे काळीज चिरत असत ... पण त्याला कुठून कळणार हे सगळं??  जीवाची होणारी ती तगमग सहन करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाही हे कटू सत्य मात्र तिला कळून चुकलं होतं . आणि हे सगळं आपण सांगण्याआधीचच त्याने एका वाक्यात सगळं सांगून पण  टाकलं.....!! तिला हसू आलं स्वतःचंच .... !! तसाच आहे तो अजूनही... नाही बदललाय... !!
                                तिने त्याला काहीही  न सांगण्याचं ठरवलं ... CCD  मध्ये AC असून सुद्धा तिला थोडा घाम फुटलाच.. त्याने सहज गप्पा मारता मारता सगळ्या friends ची चौकशी केली ..कोण कुठे आहे, तमका काय करतो, अमकी काय म्हणतेय, कोणाची लग्न झाली आणि कोणाला छोटा बच्चू आहे ... आणि मग म्हणाला तिला , ''तुझं  पण लग्न झालेले कळलं मला पण बोलावलं नाहीस तू  मला , तुझ्या लग्नाला... !!! तुझ्या best friend ला नाही वाटलं बोलवावंसं  तुला?"
                                 ती फक्त हसली थोडीशी.. कारण त्यालाही माहित होतं यामागचं कारण काय ते.. त्याच्या समोर  कोणा  दुसऱ्याला आपला नवरा मानून वरमाला घालणं तिला किती अवघड झालं असतं हे त्याला माहित होता... कदाचित त्याला ते जाणवलं न मग तो सावरून बसला. इतर गोष्टी बोलू लागला...
                          तिला जाणवलं किती बदललो आपण... आपल्यातलं नातं ... ??? एके काळी एकमेकांसोबत मैत्रीपूर्ण नात्यातून नंतर एकमेकांचे भावी जोडीदार म्हणून एकत्र स्वप्न पाहत पाहत अचानक किती लांब गेलो एकमेकांच्या ....!! तासनतास गप्पा मारणारे , chating करणारे  आपण आज चाचपडतोय एकमेकांशी बोलायला .... इतकं अंतर निर्माण झालं या एक दोन  वर्षात .....??????????
                                  तो सांगत होता , घरी सध्या काय चालू असतं ... बायको बोलू पहाते  पण मलाच बोलावसं वाटत नाही फार... मग ऐकत राहतो शांतपणे.. समजूतदार रहायचा प्रयत्न करतो, पण कधी कधी तोल जाईल असं वाटू लागतं अन, मग तुझी खूप आठवण येते ... तू कशी समजावून सांगायचीस, तू कसा धीर द्यायचीस ... तू कसं मला समजून घेऊन माझा राग शांत करायचीस ... आणि मग खूप अस्वस्थ होऊन जातो मी....!!!
                      तिला ते ऐकून बरं वाटलं , तो आपल्याला विसरला नाही हे जाणवल्याने तिला समाधान वाटलं. त्याच्या बोलण्यातून तिला जाणवलं की आज त्याला कळतेय प्रेमाची किंमत ...  पैसा, गाडीबंगला, कपडेलत्ते यांच्यापेक्षाही आपल्यावर मनापासून प्रेम करणारं माणूस आपल्या जवळ असेल तर आपण खरे श्रीमंत असतो , हे त्याला आपण वेळोवेळी सांगायचो जे त्याला आता पटतंय ...!! उशिरा का होईना , त्याला ते पटलं हेच महत्वाचं वाटलं तिला..
                            त्याला मोकळेपणाने खूप काही बोलायचं आहे हे तिला जाणवलं. त्यामुळे त्याला या क्षणी थांबवणं अवघड आहे, पण थांबवावं लागणार होतं .... म्हणून तिने त्याला मधेच थांबवत सांगितलं, " आपण बोलू परत कधीतरी, आज जरा घाई आहे. घरी पाहुणे येणार आहेत. तो थोडा थबकला , पण लगेच सावरत म्हणाला ,''ठीक आहे ... तुझा contact number तर मिळाला आहेच... बघू परत कधी भेटता येतंय ते.... !! पण लवकरच भेटशील ना कधीतरी परत मला ??? खूप काही बोलायचंय तुझ्याशी .... "
                             त्याला होकार देऊन तिने काढता पाय घेतला आणि मागे न बघता ती पुढे चालत राहिली , पण तिला  जाणवलं की त्याची नजर अजूनही तिच्यावर खिळलेली आहे आणि तिच्यासोबतच पुढे चालली आहे... !!!
   
 


          

बुधवार, १८ जानेवारी, २०१७

निरोप

' निरोप घेणं ' किंवा ' निरोप देणं ' खरंच सोप्पं असतं का? निरोप देताना किंवा घेताना मग डोळे का पाणवतात? निघता निघता पाय मागे का घुटमळतात ? पुन्हा भेटण्याची इच्छा व्यक्त का होतात? खूप आवरून देखील आठवणी फितूर का होतात आणि मनाचा बांध का फुटतो?? किती अवघड वाटतं अशा वेळी??
      आपल्याच आवडत्या व्यक्तीचा निरोप कधीतरी नियती आपल्याला घ्यायला लावते, तर कधी आपलचं माणूस अचानकपणे आपल्यापासून इतकं दूरं जातं कीआपल्यालाच कळत नाही, काय झालं अन, कसं झालं ते?...त्या वेळी मनात निर्माण होणारी कंपनं .... मनाची तगमग... अवघडलेपण , सैरभैर झालेलं मन  आणि हतबल झालेले आपण... कधी कधी निरोप घेतलेल्या व्यक्ती त्यांच्या आठवणींचा निरोप मात्र घेऊ देत नाहीत मनाला.... अन, मग मनाची ती दोलायमान स्थिती सावरता सावरता कठीण होतं ...   ' या आठवणींचा , या व्यक्तीचा आपण निरोप घेतलाय आपण ' हे बजावून देखील मन मात्र पुन्हा पुन्हा त्याच आठवणीत गुंतत राहतं ... इतकी अवघड असते का निरोपाची वाट...???