मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

जीवनातली रंगपंचमी

                   जीवनातली रंगपंचमी साजरी होते ती त्यातील माणसांच्या सहभागामुळे, विविध रंगांमुळे....!!! आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसे आपल्यात सामील होतात.... आपल्या आयुष्याला बहरायला, फुलायला, रंगीबेरंगी करायला ही माणसेच हातभार लावतात...... प्रत्येकाचे रंग निराळे....!!!
              मग हे रंग कधी शहाणपणाचे कधी वेडेपणाचे; कधी उत्साहाचे तर कधी नैराश्याचे... कधी शांततेचे...धीरगंभीरतेचे....आतुरतेचे तर कधी विरहाचे.......अशी ही आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रसंगांनी सजलेली रंगपंचमी आपल्या आयुष्यात कधी आपल्याला हसवते...कधी रडवते...खिन्नता आणते...विचार करायला लावते... विचारहीन बनवते... कधी अपराधी बनवते...हतबल बनवते... संयमी बनवते.... अचानक गप्प बसवते...आणि या विविध मानवी भावनांच्या कल्लोळात अचानक एकटं पाडते.... पुढच्याच क्षणी आपल्या एखादया दडवून ठेवलेल्या आठवणींचं रान मोकळं करते, अन् मग सुरु होतो पुन्हा एक लढा.... भूतकाळ आणि वर्तमानात दोलायमान झालेल्या मनाचा.... आणि पुन्हा त्या मनाला सावरण्याचा....!!! मात्र या सगळ्यातून एक मानवी मन किती अन् काय काय शिकतं, जे आयुष्यभराची शिदोरी म्हणून कायम रहातं........ एक माणूस म्हणून घडताना......!!!!

शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१२

संवेदनशीलता

संवेदनशीलता जपणं.... खरचं खूप त्रासदायक असतं अनेकवेळा...!!! उत्कटतेने व्यक्त केलेल्या भावना... मग त्या आनंदाच्या, निराशेच्या, विरहाच्या, दुःखाच्या, प्रेमाच्या.....इतक्या उत्कटतेने व्यक्त कराव्यात का नाही हा प्रश्ण मनात निर्माण होतो.... खोल जपलेली प्रत्येक भावना व्यक्त नाही झाली तरी अस्वस्थता जाणवतं रहाते हे त्याचचं लक्षण नाही का???ती भावना व्यक्त करताना जर समोरची व्यक्ती तितक्याच उत्कटतेने तो भाव जाणू शकली तर सोन्याहून पिवळं.....!!!! पण जर नाही जाणू शकली तर मात्र कायम एक बोच मनात रहाते की आपण ज्या व्यक्तीला विश्वासाने, हक्काने काही सांगू इच्छितो पण ती व्यक्ती त्यापासून कोसों दूर आहे या भावविश्वापासून.... तिला आपली साद ऐकू जात नाही....आणि उरते फक्त खोलवर निराशा.... संवाद तुटल्याची भावना.....अधूरा रहाणारा संवाद....सहजपणे निर्माण झालेला उत्कट भाव; आणि तितक्याच सहज अधुरा राहिलेला तो संवाद........ कधीच पुर्ण न होणारा......!!!!

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१२

दोन घटना...

त्या एका दिवशी दोन घटना घडल्या.. एक घटना, नव्या आयुष्याच्या सुरवातीला शुभाशीर्वाद देणारी,,, आणि  त्याच दिवशी दुसरी घटना आयुष्य संपल्याची....एकाच क्षणात त्या दोन घटनांमधून मनाची झालेली  अवस्था..त्यातला अस्वस्थपणा अनुभवला मी.... लग्न होतं माझ्या सख्या लंगोटी यार असणाऱ्या मैत्रिणीचं... त्यामुळे सकाळीच आमची स्वारी लग्न मंडपी धम्माल करायला आणि कामात बुडालेली... लग्नाचा मुहूर्त जरी उशिराचा मुहुर्त होता तरी तयारी, धमाल यात तो कधी आणि कसा गेला नाहीच कळला.......!!! लग्न  झालं... बाराती निघाले आणि मी आणि माझी आई घरी आलो या विचारात की मैत्रिणीचा लग्न झालं, आता आयुष्य नव्याने सुरु झालं... छान झालं.. आणि तेवढ्यात बातमी आली कि आत्या गेली.... काहीच कारण नाही पण अचानक फोन आला कि आत्या देवाघरी गेली.... दोन मिनिट काही कळेना काय झालं  ते.... इतक्या दोन टोकाच्या  घटना आमच्या समोर घडल्या कि आम्हाला काय करावं तेच सुचेना... देवाच्या या लीला इतक्या अनाकलनीय असाव्यात का ???????? एका क्षणात आनंद हरवून गेला आणि दुःखाने मन ग्रासून गेलं... मनाच्या अस्वस्थपणाची जाणीव होऊ लागली आणि वाटल हे असाही घडू शकत.... आनंदाच्या या क्षणी असा दुखाचा डोंगर..????????? किती सैरभैर अस्वस्थपणा, अवघडलेपण जाणवावा अशा विचित्र वेळी.... शांतता पण मनाला डाचू लागावी इतकी??? मनाला अलिप्तपणे पाहताना जाणवलं की हा ही क्षण खरंच आहे आणि जो जगलो तो देखील तितकाच खरा क्षण आहे.. वास्तवाची दाहकता अनुभवणं आणि वास्तवातील सुखद गारवा अनुभवणं हे आज ख-या अर्थाने जाणवून गेलं मनाला....!!!
             माणूस आपलं आहे तो पर्यंत ते आहे हेच खरं... त्याचा आणि आपला संवाद असला किवा नसला तरी तो आहे हेच किती वेगळं असतं  नं??? आणि म्हणूनच माणसातला संवाद तुटू नये.. आपलेपणा हरवू नये... प्रेम आपुलकीची नाती इगो आणि पैशाच्या  हव्यासापोटी हरवू नयेत.... नाहीतर नातं असताना ते जाणवत  नाही आणि ती व्यक्ती गेली तरी नंतर त्या जाणिवांचा उपयोग नाही... हेच खरं....नाही का???